" विवाह बंधनातील सप्तपदी "
" विवाह बंधनातील सप्तपदी "
१. हे सौभाग्यकांक्षिणी ! तू आता विद्यासंपन्न झाली आहेस. संगणकाचे ज्ञानही अवगत केले आहेस आणि सहजपणे तू तुझ्या नोकरीतही कौशल्य प्राप्त केली आहेस.तुझ्या पायात सामर्थ्य आहे. पंखात भरारी घेण्याचे बळ आहे,पण आज तू दोन घराण्यांना तुझ्या सद्विचारांनी एकत्र बांधणार आहेस.
२. हे रमणी,तुझं हे दुसरं पाऊल आहे,त्या पावलावर तू पतीसमवेत सुंदर स्वप्न पूर्ण करणार आहेस. या पावलावर तुला साऱ्या घरात आनंद निर्माण करायचा आहे. तू आनंदी असशील तरच तुझं कुटुंब आनंदी होईल. त्यामुळे " आनंदी जीवन " हे सूत्र लक्ष्यात ठेव.
३. हे प्रज्ञावंत मुली, तू खूप शिकलीस आणि नोकरीही करतेस याचा अहंपणा करू नकोस. कुणास तुच्छ लेखू नकोस. माणसातलं माणूसपण जपत जपत सासू सासऱ्यांवर आई वडिलांसारखं प्रेम करण्याचं ठरवुन तू तिकडे पाऊल उचलले आहेस.
४. हे विद्याश्री, तुला पतीची साथ आयुष्यभर हवी आहे असे मनोमन ठरवुन चौथे पाऊल उचलणार आहेस. पतीच्या सोबत त्याच्या घरातील अनेकांशी तू नव्या नात्याचा सुंदर गोफ बांधणार आहेस.
५. हे ललने, पाचवं पाऊल उचलताना तू हे लक्ष्यात घे की,घराचा ' ताल ' आणि ' तोल ' तुला छानपैकी सांभाळायचा आहे. जेवढं प्रेम वाटेवरती देत जाशील त्याच्या दुप्पट प्रेमाने तुझी ओंजळ नक्की भरेल.
६.हे मानिनी, सहाव्या पावलाशी तू हे ठरवणार आहेस की,ज्या योग्य चांगलया परंपरा,रिती रिवाज आहेत ते तू पुढे नेणार आहेस पण त्यात नवविचारांचे बदल घेऊन त्याची भर टाकणार आहेस. नव्या विचारांच्या दिशेने जाताना कुणी दुखावणार नाही ना म्हणून तू नक्कीच काळजी घेणार आहेस.
७. हे सृजनशालिनी, तू तुझ्या संसारवेलीवर काही दिवसांनी नवीन जीव निर्माण करणार आहेस. तो मुलगा असू दे नाही तर मुलगी असू दे,तुला समभावनेने त्याचं यथासांग पालनपोषण करायचे आहे. या चिमुकल्या जीवाला नवीन जग दाखवायचं आहे हे लक्ष्यात ठेव.
शुभं भवतु !!!
Comments
Post a Comment