गरज पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाची

 काही महिन्यांपुर्वी दिल्लीतील प्रदुषणाची बातमी वाचली.तेथे आता जगताना तोंडाला मास्कच लावून फिरायला पाहिजे कारण तेथील वायुप्रदुषणामुळे मोकळा श्वास घेणेही कठीण होऊन बसले आहे.सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना सुद्धा तेथे सांगत आहेत की,आताची तेथील सकाळची हवा सुद्धा आरोग्याला धोकादायक आहे.निसर्गाच्या या परिस्थितीला जबाबदार कोण ? आपणच ना ! औद्योगिकीकरणाच्या नावाखाली वायुप्रदुषण करणारे उद्योग कोणी उभारले ? कच्च्या नैसर्गिक मातीचे कॉंक्रेटीकरण कोणी केले ? पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुचे तेलसाठे मर्यादीत आहेत,हे माहित असताना त्याच्या भरमसाट वापर कोणी केला ? ते आता काही दशकात संपण्याच्या मार्गावर आहेत,याला जबाबदार कोण ? आपणच ना !
    ही झाली आपल्या देशाच्या राजधानीची गत.आपली मुंबईची परिस्थितीही काही वेगळी राहिलेली नाही.हवामानबदल(क्लायमेट चेंज) चा परिणाम येथेही दिसत आहे.सप्तबेटांची नगरी एकेकाळी निसर्गसौंदर्याची खाण होती.औद्योगिकीकरणाने तिचे रुपडच पालटुन टाकले.देशाची आर्थिक राजधानी झाल्याने खुप प्रमाणात वृक्षतोड झाली.त्याने निसर्गाची प्रचंड हानी झाली.वाहतुकीने वायूप्रदुषण वाढले.घनकचरा नियोजनाचा प्रश्न गंभीर झाला.ज्या मुंबईला पावसाचे नेहमीच वरदान लाभले आहे,तिला आज ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सतावतो आहे आणि त्याला कारणेही तशीच आहेत.

याचे मुख्य कारण म्हणजे हवेमध्ये वाढलेल्या हरितवायुंचे प्रमाण यामध्ये मुख्यत्वे करुन कार्बन डायऑक्साईड,मिथेन आणि सल्फर हेक्झाफ्लुओराईड.त्याचे परिणाम आपण पाहत आहोत की,सरासरी तापमानात झालेली वाढ.शहरामध्ये वाढत्या लोंढ्यांना राहण्यासाठी घरे हवीत,त्यासाठी जंगलांवर,निसर्गावर अतिक्रमण केले गेले आणि मोठमोठे कॉम्प्लेक्स उभे राहिले.आज आरे कॉलनी सारखा एक हरितपट्टा जो मुंबईचा प्राणवायू आहे,त्यालाही विकासाच्या नावाने संपवण्याचा प्रयत्न चालू आहे.मेट्रो कारशेड सारखे प्रकल्प कांजुरमार्ग सारखे पर्याय असतानाही आरेच्या जंगलातील हजारो झाडांची कत्तल करुन करण्यात येत आहेत.पर्यावरणवाद्यांनी विरोध केल्यावर ते विकासाला अडसर निर्माण करत आहेत,असा कांगावा केला जात आहे.आता उन्हाळ्याच्या दिवसांत इतके गरम होत आहे की,पंखा लावला तरी उकाडा काही कमी होत नाही.पावसाळ्यातही तीच स्थिती.पाऊस वेळेवर नाही,अवेळी पडणारा पाऊस,त्यामुळे शेतकरी नुकसान होऊन हतबल झाला आहे.एखाद्या दिवशी पडणारा महाप्रलयी पाऊसामुळे २६ जुलैसारखी मुंबईत पुरग्रस्त परिस्थिती निर्माण होत आहे.हिवाळ्यात थंडीच्या दिवसात थंडी कुठेतरी गायबच झालेली दिसते.


        यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर मुंबईची दिल्ली व्हायला वेळ लागणार नाही.सिएनजी वर चालणारी गाडी वापरा.सार्वजनिक वाहतुकीचा जास्त वापर करा.कमी अंतरासाठी सायकल वापरा.ओला कचरा,सुका कचरा असे वर्गीकरण करुन त्याचे योग्य नियोजन करा.शहराला हरितशहर बनवण्यासाठी सहकार्य करा.झाडे लावा,झाडे जगवा.पर्यावरण दक्षता मंडळ,वनशक्ती यांसारख्या पर्यावरणासाठी झटणारी संस्था यांना आर्थिक पाठबळ द्या.स्वयंसेवक होऊन त्यांच्या कार्यात मदत करा.तरच या ग्लोबल वॉर्मिंगच्या विलख्यातुन आपल्याला बाहेर पडता येईल.आपल्या आईला ताप भरल्यावर आपण तिला डॉक्टरकडे नेतो,त्यावर ईलाज करतो.आज आपल्या धरणीमातेला  ताप आलेला आहे.तिचे अंग फणफणते आहे.तिच्या या परिस्थितीचे जबाबदार आपणच आहोत.मग त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करायला नकोत का ?

येणारा पर्यावरण दिवस आपल्याला अनेक आव्हाने घेऊन येत आहे.आपल्याला पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे.एक तरी झाड लावुन त्याची काळजी घेतली पाहिजे.चला उठा,आपल्या मुंबईला पुन्हा एकदा तिचे हरित वैभव प्राप्त करुन देऊ या.सर्व मानवाचे हित हे वसुंधरेच्या संवर्धनातच आहे. 

Comments